कोल्हापूर : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात येत असताना तावडे हॉटेल थांब्याजवळील प्रवेश कमान ही कोल्हापूरची विशेष ओळख बनली होती. ती खराब झाल्याने काल रात्री ती भुईसपाट करण्यात आली. यामुळे करवीर नागरी प्रवेश करतानाची एक ओळख आता काळाच्या पडद्याआड गेली आहे.
कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिणेस कागल, शिवाजी विद्यापीठ मार्ग, कोकणाकडून रत्नागिरी, जोतिबा मार्ग, राधानगरी मार्ग असे काही प्रमुख मार्ग आहेत. यापैकी केवळ पुणे बेंगलोर मार्गावर तावडे हॉटेल परिसरातील मुख्य मार्गावर गेली २७ वर्षापूर्वी स्वागत कमान उभारण्यात आली होती.
महानगर पालिकेत जनसंपर्क अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मंडलिक यांनी स्वतःची जाहीरात कंपनी सुरु केली होती. या जाहीरात कंपनीमार्फत महापालिकेशी करार करून सर्व हक्क कंपनीकडे घेऊन ही स्वागत कमान उभी केली होती. त्यानंतर २५ वर्षे ही कमान या कंपनीकडे राहिली.
तीन वर्षापूर्वी कोल्हापूर शहराचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ही स्वागत कमान खाजगी कंपनी किंवा व्यक्ती कडे नसावी. त्यावर जाहीराती ऐवजी राजर्षी शाहू महाराज यांचे नाव असावे अशी भूमिका घेऊन सदर जाहीरात कंपनीस पर्यायी जागा देऊन या कमानीवरील हक्क सोडण्याबाबत यशस्वी प्रयत्न केले. या कंपनीने कमानीवरील हक्क सोडल्यानंतर कमानीचा ताबा कोल्हापूर महानगर पालिकेकडे आला होता.
चुकीच्या पद्धतीने केलेले दर्जाहीन बांधकाम यामुळे वहातुकीस अडथळा आणि धोकादायक बनलेल्या या स्वागत कमानी बाबत वारंवार होणारी टिका होत होती. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दखल घेऊन महानगरपालीकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करून ही कमान काढून टाकावी. या मार्गावर नवीन स्वागत कमान बांधावी अशा सूचना दिल्या. नवीन स्वागत कमानी साठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यामुळे काल महापलिकेच्यावतीने ही कमान मध्यरात्री काढून टाकली. कोल्हापूर शहराची एक दृढ ओळख नेस्तनाबत झाली आहे.
कमान काढण्याचे तयारी महापालिकेने काल सायंकाळपासूनच चालवलेली होती. यासाठी रात्रभर या मार्गावरून शहरात ये जा करणारी वहातूक उचगाव आणि कसबा बावडा मार्गे वळवून त्याबाबत दिवसभर सूचना देण्यात आल्या होत्या.
रात्री १० वाजता आवश्यक यंत्रसामुग्री जेसीबी, पोकलँड, टिपर आदी मशीनरी, इंजिनियर, तंत्रज्ञ, कामगार असे मनुष्यबळ यांच्या सहाय्याने कमान पाडण्याचे काम सुरु केले. १२ – ३० वाजे पर्यंत कमान जमीनदोस्त करून पहाटेपर्यंत बांधकामातील सर्व साहित्य बाजूला करून हा मार्ग सकाळी वहातुकीसाठी खुला करण्यात आला.
बास्केट ब्रिज होणार
दरम्यान, सांगली फाटा ते उचगाव मार्गावर नवा उड्डाण पुल, कागलजवळचा उड्डाण पूल आणि कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रिज यासाठी १ हजार ५० कोटी रुपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे महापूराच्या काळात महामार्गावरून कोल्हापुरात सहज येता येईल आणि बास्केट ब्रिजमुळे तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी थांबेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
