कोल्हापूर : कोल्हापुरात येऊ इच्छिणाऱ्या आयटी कंपन्यांची यादी दाखवा. लगेच १०० एकर जागा ‘आयटी पार्क’साठी देतो, असे विधान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील १८ विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन ‘कोल्हापूर फर्स्ट’ या मंचाची स्थापना केली आहे. त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी फीत कापून केले. यावेळी पाटील यांनी हे विधान केले. त्यावर आयटी असोसिएशनचे शांताराम सुर्वे यांनी जिल्ह्यात ३५० आयटी कंपन्यांचे कामकाज सुरू झाल्याचा दाखला दादांना दिला.
मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील खंडपीठ, उद्योग, आयटी पार्क असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवावेत. मी पुण्याचा आमदार, सांगलीचा पालकमंत्री असलो तरी माझ्यासाठी ‘ कोल्हापूर फर्स्ट’ असल्याने हे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढाकार घेईन.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याला महत्त्व देण्यात येईल. कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून हे विषय तडीस नेण्यासाठी त्यांच्या पाठीशी आहोत. कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविकात कोल्हापुरातील प्रश्नांची मांडणी करून त्यासाठी स्वतंत्र परिषद घेण्याची मागणी केली. बाळ पाटणकर, सर्जेराव खोत, जयदीप पाटील, सारंग जाधव, अमोल कोडोलीकर, स्वरूप कदम, दिनकर पाटील, बाबासाहेब कोंडेकर, हरिश्चंद्र धोत्रे, विश्वजित देसाई आदी उपस्थित होते.