कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगी संदर्भात शनिवारी न्यायसहायक विज्ञान (फॉरेन्सिक लॅब), तसेच विमा कंपनीने आढावा घेतला. या घटनेत १६ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दाखल केली आहे.

शुक्रवारी रात्री केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून ते बेचिराख झाले. या घटनेबाबत नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर म्हाब्री यांनी १६ कोटी २० लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान झाली असल्याची फिर्याद राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. आज दुपारी पोलीस विभागातील न्यायसहायक विज्ञान विभागाच्या पथकाने दुर्घटनेच्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी आगीच्या अवशेषांचे नमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत. या पाठोपाठ नाट्यगृहाचा विमा उतरविलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

हेही वाचा…केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी २० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाहणीनंतर घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण

महापालिकेच्या अग्निशामक विभागाने अग्निपरीक्षण अहवाल नागरिकांना पाहण्यासाठी आज उपलब्ध केला. प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांनी नाट्यगृह इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून घेण्याची सूचना केली. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. या वेळी चौकशी समितीचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.