कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संकेतस्थळावरून करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी संदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात आला आहे. याबाबत प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी भाविकांच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही. या प्रकाराची देवस्थान समिती, जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर दिलीप देसाई यांनी प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ कारवाई केल्याबद्दल रविवारी आभार मानले. याचवेळी त्यांनी महालक्ष्मी देवीच्या नावाने देवस्थानचे अधिकृत संकेतस्थळ असावे. महालक्ष्मी देवी नामाशी साधर्म्य असणाऱ्या अनधिकृत संकेतस्थळाची चौकशी करून ती हटवण्यात यावी. बोगस संकेतस्थळ उघडून भाविकांची आर्थिक फसवणूक करणारे, देणगी गोळा करणारे ॲप्स बंद करण्यात यावेत. वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिराच्या संकेतस्थळाची पाहणी करून तेथेही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.