कोल्हापूर : साडेतीन खंडपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात आज पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. तोफेची सलामी होऊन नवरात्र उत्सवाच्या विधींना सुरुवात झाली. यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध सुविधांचा वापर केला आहे. कोल्हापूर शहरात भाविकांची गर्दी पहिल्या दिवसापासूनच वाढू लागली आहे. मंदिर गर्दीने फुलले आहे.
राज्यभरात शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रथा-परंपरेनुसार महालक्ष्मी मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली आहे. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली. शारदीय नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस असल्याने असंख्य भाविकांनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. भाविका कडून देवीला साडी-चोळी आणि खण-नारळाची ओटी आवर्जून भरली जाते. कोल्हापुरातील या मंदिरात शेखर मुनेश्वर कुटुंबाच्या हस्ते घटस्थापनेचा धार्मिक विधी करण्यात आला.
करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे मंदिर पहाटे चार उघडण्यात आले. श्री पूजकांकडून घटस्थापनेसाठी पूजेची तयारी करण्यात आली, सकाळच्या सत्रात मंदिरात घंटानाद झाल्यानंतर अभिषेक आणि देवीची आरती करण्यात आली. मंदिरात विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.
प्रथेप्रमाणे महालक्ष्मी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात घट बसल्यानंतर जाधव कुटुंबीयांकडून तोफेची सलामी दिली जाते.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत देवीच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला तर आज पहिल्या दिवशी देवीची श्री कमलाई देवी स्वरूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
भाविकांना अद्यावत सुविधा
आज पहिल्याच दिवशी देशभरातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दर्शन रांगेतून गाभाऱ्यापर्यंत दर्शन घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. तर यंदा मंदिरातील मोठ्या आकाराच्या पायऱ्यांना रॅम्प लावण्यात आले असून यामुळे दर्शनाच्या रांगा अधिक वेगाने पुढे सरकत आहेत. यामुळे भाविकांची चांगली सोय झाली असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी सांगितले.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
दहा दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्रउत्सवात देशभरातून २० लाख भाविक या काळात करवीर निवासीनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतील. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना दर्शन रांगेत उभारण्यासाठी पत्र्याचे शेड, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) तंत्रज्ञानाचा उपयोग करून गर्दीवर नियंत्रण , शिस्त ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरावर अहोरात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून जिल्हा पुणे दलाच्या वतीने मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.