महापुरामुळे सातत्याने नुकसान होत असल्याने कायमस्वरुपी तोडगा काढला जाणार आहे. त्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूर परिस्थिती आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रकाश आबिटकर आदी आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे म्हणाले, पंचगंगा नदीच्या पुरामुळे शेतपिक, जनावरे व अन्य मालमत्तेचे अतोनात नुकसान होते. स्थलांतराच्या प्रमाणात वाढ होत आहे. याला आळा बसण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल. राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत करण्याचे जाहीर केली आहे.

कोल्हापूरला ३ कोटी –

कोल्हापूरातील गांधी मैदानावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शिंदे यांनी तात्काळ तीन कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. वीज वितरण कंपनीने अतिवृष्टी व पुरामुळे खंडित वीज सेवा तात्काळ सुरु करण्यासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करावा, असेही सूचित केले.

मुख्यमंत्री भेटले पत्रकारांना –

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत धरपकड झाल्याने काहीसा तणाव होता. याचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत झाला. परिणामी मुख्यमंत्री आढावा घेणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांनी मज्जाव केला. पत्रकार बैठकीस्थळी जाण्यासाठी आग्रही होते. अशातच पत्रकारांना पोलिसांनी अरेरवीची भाषा सुरू केली. पत्रकारांनी बैठकीकडे जायचे नाही असा निर्धार करीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धनंजय महाडिक, पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी विनवणी करूनही पत्रकार ठाम राहिले. अखेर बैठक संपवून मुख्यमंत्री शिंदे, चंद्रकांत पाटील हे चालत कार्यालयाबाहेर पत्रकारांजवळ येऊन संवाद साधला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur permanent solution to flood will be found eknath shinde msr
First published on: 13-08-2022 at 22:37 IST