कोल्हापूर : लोकहिताचे अनेक निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली येथे एकनाथ शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या प्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले, की गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती शासनाने कोल्हापूरची विकासाचे चांगले निर्णय घेतल्याने मतदार महायुतीच्या बाजूने उभे राहतील. कार्यकर्त्यांनी कामाला लागून महानगरपालिका जिंकून दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

त्यांचे स्वागतच पण…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सामील होणाऱ्यांचे स्वागतच आहे. परंतु, महायुती कोणावरही अवलंबून नाही हे विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या कौलावर दिसून आले आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजित जाधव, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रणजित मंडलिक, दीपक चव्हाण, सुनील जाधव, गणेश रांगणेकर, कमलाकर जगदाळे, तन्वीर बेपारी उपस्थित होते.