कोल्हापूर : कोल्हापुरातील दसरा उत्सवाला राज्य शासनाकडून शाही उत्सवाचा दर्जा मिळालेला असून, या उत्सवाचा प्रारंभ उद्या मंगळवारी होणार आहे. जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

तत्पूर्वी सायंकाळी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उद्घाटन राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृह, दसरा चौक येथे होणार आहे. दसरा महोत्सव उद्घाटन समारंभ झाल्यानंतर ‘गाथा शिवशंभूची’ ऐतिहासिक महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तसेच शहरात दाखल होणाऱ्या सर्व भाविक- पर्यटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस

यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवामध्ये कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचा समावेश केला आहे. त्यामुळे यावर्षीपासून कोल्हापूरचा दसरा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून, यानुषंगाने मंगळवारी पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे.