दयानंद लिपारे, कोल्हापूर

प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, राजकीय हल्ले झाले, शत्रुत्व निर्माण झाले; पण निकाल लागला आणि हे सारे वैरभाव विसरत विजेत्याने आपल्या पराभूत सहकाऱ्याची भेट घेतली. त्यांच्या सदिच्छा आणि त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकारणात दुर्मीळ असणारा हा प्रसंग बुधवारी हातकणंगले मतदारसंघात घडला आणि त्याचे साक्षीदार ठरले नूतन खासदार धैर्यशील माने व मावळते खासदार राजू शेट्टी. निवडणुकांमध्ये तयार होणारे वैरभाव आयुष्यभर उरी बाळगत जगण्याच्या परंपरेला छेद देणाच्या या प्रसंगाची आज सर्वत्र कौतुकाने चर्चा सुरू होती.

राजू शेट्टी यांच्या उमेदवारीमुळे हातकणंगले मतदारसंघाकडे देशभराचे लक्ष लागलेले होते. या मतदारसंघात शेट्टी यांचा धक्कादायक पराभव करत शिवसेनेचे अगदी तरुण उमेदवार धैर्यशील माने हे ‘जायंट किलर’ ठरले. शेट्टींसारख्या मुरलेल्या नेत्याचा पराभव करत माने यांनी बाजी मारल्यामुळे माने हे सर्वत्रच चर्चेत आले होते. निकालानंतर त्यांच्याविषयी सर्वत्र कुतूहलाने विविध विषय बोलले जात होते. या पाश्र्वभूमीवरच त्यांनी आज निकालाच्या बरोबर पाचव्या दिवशी ‘मास्टर स्ट्रोक’ देत सर्वानाच आश्चर्याचा धक्का तर दिलाच, परंतु त्यातून राजकारणात एक नवा आदर्श निर्माण केला.

गेले दीड महिना ज्या निवडणुकीवरून एकमेकांविरोधात जिथे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, राजकीय हल्ले झाले, शत्रुत्व तयार झाले, त्याच मतदारसंघात निकाल लागल्यावर जिंकलेल्या धैर्यशील माने यांनी आज थेट शेट्टी यांचे घर गाठले ते त्यांच्याच शुभेच्छा आणि त्यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी.

निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले.  माने यांचे हे घरी येणे शेट्टी कुटुंबीयांसाठी देखील धक्का देणारे होते. परंतु अवघ्या शेट्टी कुटुंबीयांनी माने यांचे मनापासून स्वागत केले. नूतन खासदाराचे शेट्टी यांच्या पत्नी संगीता यांनी औक्षण करत स्वागत केले.  चिरंजीव सौरव याने पेढा भरवून तोंड  गोड केले आणि प्रत्यक्ष शेट्टी यांनी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. माने यांनी देखील या वेळी शेट्टी यांची गळाभेट घेतली, शेट्टी यांच्या आईला नमस्कार करत आशीर्वाद घेतले. शेट्टी यांनी या वेळी माने यांना त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या, तर माने यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याची भावना बोलून दाखविली. शेट्टी यांच्या आईने या दोघांनाही जवळ बसवले आणि आशीर्वाद दिले. ‘जसे काम माझ्या मुलाने केले त्याहूनही अधिक चांगले काम करा’ असे सांगत त्यांनी धैर्यशील यांच्याकडे पाहात माझा नातूच खासदार झाल्याचे सांगितले.

राजकारणात अभावानेच दिसणाऱ्या या क्षणाचे साक्षीदार या दोन नेत्यांसह त्यांचे कार्यकर्ते देखील घेत होते. निवडणुकीच्या काळात नकळतपणे उगाचच निर्माण झालेले वैरभाव विसरत त्यांचेही मनोमिलन घडत होते.

धैर्यशील माने माझ्या घरी आल्यामुळे खूप आनंद झाला. राजकारणातील शत्रुत्व कायम ठेवायचे नसते.  आज आमच्या भेटीतून हाच संदेश जाईल. धैर्यशील यांनीही लोकसभेत चांगले प्रश्न मांडावेत. माझा त्यांना  पाठिंबा आणि सदिच्छा असतील.   – राजू शेट्टी

केवळ निवडणुकीपुरता असलेला विरोध हा निकालानंतर संपुष्टात आला पाहिजे. शेट्टी जरी पराभूत झाले तरी त्यांचे मार्गदर्शनही मला हवे आहे. मतदारसंघात हे सदिच्छेचे वातावरण कायम राहावे आणि विकास व्हावा या हेतूनेच मी शेट्टी कुटुंबीयांची भेट आणि आशीर्वाद घेतले.       – धैर्यशील माने