कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिर, पंचगंगा घाट हजारो पणत्यांनी उजळला. परंपरेनुसार पहाटे दीपमाळा उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर आवारात रांगोळी काढून भाविक दीप लावताना दिसत होते. नेत्रदीपक आतषबाजी करून दीपोत्सवाची सांगता झाली.

पहाटेच्या नीरव अंधाराला भेदून प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांचा झगमगाट, रांगोळीचा गालिचा, रोषणाई, प्रबोधनाची परंपरा, गीत मैफल आणि नदीची विधिवत पूजा करून पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या हजारो दिव्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सवाची सांगता झाली.

दरम्यान, पंचगंगा घाटावर जुना बुधवार पेठ शिवमुद्रा प्रतिष्ठानातर्फे ५१ हजार पणत्यांच्या प्रकाशाने घाट उजळून निघाला. भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे, प्रतिष्ठानाचे अध्यक्ष दीपक देसाई, माजी भाजप अध्यक्ष संदीप देसाई, अभिषेक बोंद्रे, ऐश्वर्या मुनेश्वर, प्रताप जाधव, प्रकाश गवली, अफजल पिरजादे, नेपोलियन सोनवणे, धीरज काटकर, अविनाश साळोखे, सुशील भांदिग्रे, राजेंद्र करंबे, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी उपस्थित होते.