कोल्हापूर : उत्पन्नाच्या अनेक बाबी उपलब्ध असतानाही कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न अपेक्षित गतीने वाढत नाही. उद्यामशीलतेचा वारसा आता कागदावर राहिला असून उद्योगाचे चक्र गतिमान होण्याऐवजी मंदगतीचा ठपका लागतो आहे. उसाचे नगदी पीक सोबतीला दूध व्यवसायातून येणारा पैसा, चौफेर पर्यटनाची चांगली संधी, नानाविध उद्याोगांचीही मालिका असे अर्थकारणाला गती देणारे पूरक वातावरण कोल्हापुरात आधीपासूनच असूनही कोल्हापूरची विकासगती पुढे जात नाही. दरडोई उत्पन्नाचा आलेख उंचावत नाही.

हेही वाचा >>> आईच्या उत्तरकार्याला १५० हापूस आम्र रोपांचे वाटप; पुत्राचा पर्यावरण रक्षणाचा संदेश

२०२१-२०२२च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ८ हजार रुपये इतके आहे. ते राज्याच्या दरडोई उत्पन्नापेक्षा (२ लाख १५ हजार रुपये) पेक्षा कमी आहे. नेमके स्थान मोजायचे तर राज्यात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर सातव्या स्थानी आहे. तसे पहिले तर गेल्या दहा वर्षांमध्ये कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न जवळपास एक लाख रुपयांनी वाढले आहे. म्हणजे, सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात कोल्हापूरचे आर्थिक उत्पन्न १ लाख ४ हजार रुपये होते. अर्थात तेव्हाही मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांनंतर कोल्हापूरचा क्रम राहिला होता. महालक्ष्मी, जोतिबासारखी महत्त्वाची देवस्थाने, पर्यटनाचे अनेक आकर्षक पर्याय, फौंड्री, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्याोग, सोने -चांदी व्यवसाय, बारमाही फुलणारी नगदी पिकांची शेती, विकसित विमानतळ अशा भक्कम बाबी असतानाही कोल्हापूरच्या प्रगतीचे घोडे पेंड खात आहे. विकासाचे आराखडे उत्साहाने तयार होतात आणि यथावकाश रेंगाळतात, हा पूर्वानुभव निरुत्साही करणारा.

हेही वाचा >>> कोल्हापुरात एकाच वेळी तीन महिलांचे जटा निर्मूलन; आणखी एक पुरोगामी पाऊल

सूक्ष्म, लघु व मध्य उद्योग यावर जिल्ह्याच्या उद्योगाचा गाडा मुख्यत्वेकरून उभा. असे सुमारे ६५ हजार उद्याोग आणि त्यातून साडेपाच लाख रोजगारनिर्मिती. जोडीला साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या, बँका असे सहकार समृद्ध करणारे उद्योग. काहींना उद्योग विस्तारायचा आहे. वानवा आहे ती जागा टंचाईची. एखादा बडा उद्याोग कोल्हापूरमध्ये यावा ही उद्योजकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची अपेक्षा. त्याबाबतीत ठोस असे काहीच घडत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते विकास कार्यक्रमाची प्रगती ठरल्याबरहुकूम होताना दिसत नाही. महत्त्वाचे रस्ते खाचखळग्यांनी भरले आहेत. कोल्हापूर – सांगली महामार्ग गेली तपभर उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. गृहबांधणी क्षेत्रात कोल्हापूरची परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. प्रधानमंत्री, रमाई आवास योजनेअंतर्गत घरे उदिष्टांच्या दिशेने पूर्ण होत आहेत. तर जिल्ह्याची आरोग स्थिती काहीशी सुधारताना दिसत आहे. २३ रुग्णालये, ४३ दवाखाने, ९२ प्रसूतिगृहे, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असा मोठा पसारा. वैद्याकीय सुविधा, उपचाराचा दर स्तर सुधारताना दिसत असताना अजूनही मोठ्या अपेक्षा लोक बाळगून आहेत.