मुंबई / कोल्हापूर : नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे ‘वनतारा’ने म्हटले आहे. तिला कोल्हापूरला परत पाठवावे, या मागणीसाठी रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली असताना वनताराने प्रसिद्धीपत्रक जारी केले. वन्यजीव विभाग तसेच जैन मठाने याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून संमती मिळविली, तर हत्तिणीला परत पाठविले जाईल, अशी भूमिकाही संग्रहालाय प्रशासनाने घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते.

नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वनताराचे व्यवस्थापन असलेल्या उद्याोगपती अंबानी यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जात आहे. त्याचा पुढचा म्हणून रविवारी भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी व समस्त जैन बांधव यांच्या वतीने राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढली. त्यावर न्यायालयाच्या आदेशानेच वनतारामध्ये हत्तिणीचे पुनर्वसन करण्यात आल्याचे स्पष्ट करतानाच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित असल्याचे पशुसंग्रहालयाने म्हटले आहे.

या प्रसिद्धीपत्रकानुसार, महादेवीला गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँगरीन, वाढलेली नखे आदी शारिरीक समस्या आहेत. तरीही तिला धार्मिक प्रथांचा भाग म्हणून मिरवणुकांमध्ये नेले जायचे. त्याबरोत्च तिला ज्या ठिकाणी ठेवले जायचे त्या जमिनीचा पृष्ठभाग धातुसदृश्य कडक असल्याने तिचे आजार आणखी वाढत गेले. याबाबत प्राणिमित्र संघटना ‘पेटा इंडिया’च्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनी हत्तिणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. उपचारांसाठी आवश्यक वैद्याकीय सोयी असलेल्या तिचे पुनर्वसन करावे, अशी शिफारस समितीने एकमताने केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै रोजी शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यांत हलवण्याचा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पिठाने २९ जुलै रोजी रिट याचिका फेटाळून लावली आणि हत्तिणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क असल्याचे सांगून स्थलांतरावर शिक्कामोर्तब केले. या हत्तिणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे, या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी विचारात घेतल्याचे ‘वनतारा’ने म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात यावे. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला तर हत्तिणीला वैद्याकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची ‘वनतारा’ची तयारी असल्याचे प्रशासनाने म्हटले.

कोल्हापुरात आंदोलन तीव्र

पहाटे नांदणीपासून सुरू झालेल्या पदयात्रेने कोल्हापूर-सांगली महामार्ग, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश केला. ताराराणी पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हत्तीण परत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. पदयात्रेतील नागरिकांनी माधुरी परत करा, एक रविवार माधुरीसाठी, जिओ बहिष्कार असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. यावेळी राजू शेट्टी यांनी धार्मिक कार्यात महत्त्व असलेला, जिव्हाळ्याचा विषय असलेली महादेवी हत्तिण परत करावी अशी मागणी केली. त्यासाठी ‘जिओ’वर बहिष्कार हे पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे ‘रिलायन्स मॉल’वरदेखील बहिष्कार टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. वनतारा केंद्र हेच बेकायदा असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

सोन्याचा हत्ती

पदयात्रेमध्ये काही लोकांनी सोन्याचा हत्ती आणून महादेवी परत करण्याच्या मागणीकडे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक पदयात्रेत नेते सहभागी झाले होते.

पुनर्वसन केल्यापासून महादेवीला विशेष पशुवैद्याक उपचारांखाली ठेवण्यात आले आहे. सांधेदुखीवर जल उपचार दिले जात आहेत. त्यासाठी तिला ‘वनतारा’मधील विशिष्ट तळ्यात सोडण्यात येते. एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड आदी रेडिओलॉजिकल चाचण्या केल्या जात आहेत. नियमित फिजिओथेरपी उपचार, साखळदंड काढून टाकले असून राहण्यासाठी मऊ पृष्ठभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. तिला अन्य हत्तींबरोबर ठेवले जात आहे. – वनतारा पशुसंग्रहालय

धार्मिक कार्यामध्ये हत्ती नको

समाजाच्या भावनांचाही विचार करणे म्हणजेच महादेवीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये, अशी भूमिका ‘वनतारा’ने प्रसिद्धीपत्रकात मांडली आहे. त्याऐवजी हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.