कोल्हापूर : राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी रस्ते प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा वगळण्याची राज्य शासनाची अधिसूचना गुरुवारी एका शासन निर्णयाद्वारे मागे घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या महामार्गाच्या पर्यायाबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्ताव सादर करावा. याबाबत प्रकल्प आखणी पर्यायावर जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून करण्यात येईल. आणि अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात येतील, असेही या शासन निर्णयात म्हटले आहे.
शासनाची ही भूमिका पाहता कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महामार्ग नेण्याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे दिसत असून राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य शासनाने पवणार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग असा बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग साकारण्याचे ठरवलेले आहे .या प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. या महामार्गामुळे लोकसभा निवडणुकीला महायुतीला फटका बसला होता.
ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे परिणाम होऊ नये यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातून हा प्रकल्प जाणार नाही अशी अधिसूचना काढण्यात आली होती. तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे मित्र शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांच्या करवी ही अधिसूचना प्रसिद्ध दिली होती.

शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराचे तीव्रता अधिक प्रमाणात वाढणार आहे. पर्यावरणाचे अतोनात नुकसान होणार आहे. बारमाही पिकणारी शेती निघून गेल्याने शेतकऱ्यांवर भिकेकंगाल होण्याची वेळ येणार आहे, अशा प्रकारची मांडणी शक्तीपीठ विरोधी कृती समितीकडून होत होती. त्यासाठी आजही आंदोलने सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांनी शेतात तिरंगा लावून शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला होता.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता राज्य शासनाची भूमिका पुन्हा पूर्वपदावर आलेली आहे. आज एका शासन निर्णयाद्वारे १५ ऑक्टोंबर रोजीची शक्तीपीठ महामार्गाबाबतची कोल्हापूर जिल्हा बाबतचीची अधिसूचना मागे घेण्यात आली आहे. तसेच हा प्रकल्प शिरोळ, हातकणंगले ,करवीर ,कागल , गडहिंग्लज व आजरा अशा तालुक्यातून संभाव्य मार्ग कसा करता येईल याचा आराखडा राज्य रस्ते विकास महामंडळाला तयार करण्याचे निर्देश दिले आह. याबाबत जिल्ह्यातील मंत्री , लोकप्रतिनिधी समवेत चर्चा होऊन मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री यांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आले आहेत.