दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : निवडणूक कर्नाटक विधानसभेची असली तरी महाराष्ट्रातील नेत्यांचा आखाडा कर्नाटकात सध्या रंगला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आरोप-प्रत्यारोपाची राळ उडवून दिली आहे. यामुळे निवडणूक कर्नाटकची आहे की महाराष्ट्राची, असा प्रश्न सीमावासीयांना पडला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे व पृथ्वीराज चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांसोबतच्या कामाचा अनुभव कथन केला होता. ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने तर चव्हाण यांच्या काळात नाइलाजाने काम केले, असा गौप्यस्फोट केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी चव्हाण यांनी कर्नाटकची भूमी निवडली. निपाणी मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करायला आयती संधी मिळाली असल्याचा चव्हाण यांनी लाभ उठवला. अजित पवार यांच्या कथित राजकीय हालचालीवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत किती दिवस राहील माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहे,’ असा गौप्यस्फोट करून पवारांची कोंडी केली.
बेळगाव विमानतळावर उतरल्यावर लगेचच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नाना पटोले यांना त्यांच्या काँग्रेस पक्षात कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी अधिक बोलतात,’ असे म्हणत पटोले यांच्यावर टीका केली. त्याला अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांनी उत्तर दिले. संजय राऊत यांनी बेळगाव येथील प्रचार सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले तर त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.