कोल्हापूर : पार्ले ( ता. चंदगड) येथे वीजवाहिनीमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम भर रात्री पुराच्या पाण्यात करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे काम केले. सकाळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काम करण्यासाठी पडलेल्या खांबाच्या ठिकाणी आले. दाट धुके, जोरदार पाऊस, पुराचे वाढते पाणी असतानाही गळाभर पाण्यामध्ये कर्मचारी उभे राहून काम करत होते. तिसरी वायर काढत असताना पडलेला खांब अचानक फिरल्याने उर्वरित वायर वेगळी करणे शक्य झाले नाही. पुराची पातळी हळूहळू वाढत असल्याने सर्व कर्मचारी सुरक्षित बाहेर आले. दुसऱ्या पथकाने पर्यायी यंत्रणेद्वारे काही गावांचा वीजपुरवठा रात्री चालू केला होता.
दुसऱ्या दिवशी पुराची पाणी पातळी थोडी कमी झाली होती. महावितरण जनमित्रांनी ५० मीटर अंतरावर लोखंडी पोल चिखलातून खांद्यावरून वाहून आणला. खड्डा खणून खांब उभा केला. त्यापासून मागील चार खांबावरील तारा ओढून घेऊन रात्री या वाहिनीवरील सर्व गावांचाही वीजपुरवठा सुरू करण्यात यश मिळाले.
या कामी गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता अजित पोवार, सहायक अभियंता विठ्ठल चौगुले, गुरुप्रसाद मोरे, जनमित्र नारायण दळवी, अमोल दळवी, ओमप्रकाश पटेल, अमित गावडे, दीपक गावडे, प्रदीप तोरस्कर, खासगी कंत्राटदार यांचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.