दयानंद लिपारे
कोल्हापूर : सीमालढय़ाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम निर्माण झाला आहे. खानापूर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर निपाणीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये फूट होऊ शकते.
एकीकरण समितीने जाहीर केलेल्या ६ जागांमध्ये या दोन्ही मतदारसंघांचा समावेश असल्याने ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या सीमालढय़ाच्या निष्ठेवर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी सीमालढय़ाच्या पाठिंब्यात कोणताही बदल झाला नसल्याचे म्हटले आहे. एकीकरण समितीने बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी व निपाणी या ६ मतदारसंघांची घोषणा केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली आहे. समितीमध्ये यावेळी फाटाफूट नसल्याने अनुकूल चित्र आहे. राष्ट्रवादीने ९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये निपाणी मतदारसंघातून उत्तम रावसाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे गटाने के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याप्रकरणी बेळगाव येथील ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख अरिवद नागनुरी यांनी ‘के. पी. पाटील यांचा अर्ज असला तरी शिवसेना त्यांच्या पाठीशी राहणार नाही. उलट एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ३ मे रोजी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची सभा होणार असल्याचे सांगितले.
