काँग्रेस आमदारांनी ‘मातोश्री’वर केलेली शिष्टाई सफल झाल्याने शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून मुरलीधर जाधव यांची निवड करण्यात आली. परिवहन समिती सभापतिपदी लाला भोसले तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वृषाली दुर्वास कदम व उपसभापतिपदी वहिदा फिरोज सौदागर यांची निवड करण्यात आली.
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित विशेष बठकीत या निवडी घोषित करण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार बठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा एक सदस्य आहे. तो विरोधकांकडे झुकला असता, तर सत्ताधारी आघाडीस या पदास मुकावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांनी मातोश्री वर जाऊन चर्चा केली. परिणामी आजच्या सभेला सेना सदस्या प्रतिज्ञा निल्ले गरहजर होत्या. त्यामुळे जाधव यांचा मार्ग सोपा बनला.
स्थायी समिती सभापतिपदासाठी मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम व सत्यजित कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दोन उमेदवार िरगणात राहिल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये जाधव यांना ८ मते तर निकम यांना ७ मते पडली. जाधव यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घोषित केले. या निवडीवेळी स्थायी समिती सदस्य प्रतिज्ञा निल्ले गरहजर होत्या. पांडुरंग जाधव हे प्रभाग क्र.३९, राजारामपुरी एक्स्टेंशन या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
यानंतर परिवहन समिती सभापतिपदी लाला भोसले व विजयसिंह खाडे-पाटील दोन उमेदवार राहिल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये लाला भोसले यांना ७ मते तर खाडे-पाटील यांना ५ मते पडली. लाला भोसले यांना सर्वाधिक ७ मते पडल्याने त्यांची सभापतिपदी निवड घोषित केली. भोसले हे प्रभाग क्र. ६५, राजेंद्रनगर या मतदार संघातून निवडून आले आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी वृषाली कदम व गीता गुरव दोन उमेदवार राहिल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये कदम यांना ५ मते तर गुरव यांना ४ मते पडली. कदम या प्रभाग क्र.६८, कळंबा फिल्टर हाउस या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. महिला व बालकल्याण समिती उपसभापतिपदासाठी वहिदा सौदागर यांना ५ मते तर कविता माने यांना ४ मते पडली. सौदागर प्रभाग क्र.६२, बुद्ध गार्डन या मतदार संघातून निवडून आल्या आहेत.
या वेळी पीठासन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त पी. शिवशंकर, सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी नूतन स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापती यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापूर स्थायी सभापतिपदी काँग्रेसचे मुरलीधर जाधव
काँग्रेस आमदारांची ‘मातोश्री’वरील शिष्टाई सफल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-02-2016 at 03:35 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muraleedhar jadhav of congress elected for chairman of standing in kolhapur