कोल्हापूर : इचलकरंजी येथे मध्यरात्री एका खासगी बँकेत व्यवस्थापक असलेल्या तरुणाचा डोक्यात दगड, सिमेंट पाईप घालून निर्घृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) असे मृताचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील उमद्या तरुणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री अभिनंदन कोल्हापुरे हे कोल्हापुर रस्त्यावरील एका बारमध्ये गेले होते. तेथे वेटरशी किरकोळ वाद झाल्यानंतर ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच वेळात पेट्रोल पंपासमोर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. दगड आणि सिमेंट पाईपने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पहाटे दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

कोल्हापुरे यांचे वडील गोविंदराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आहेत. तर पत्नी गर्ल हायस्कूल मध्ये शिक्षिका आहे. त्यांचा मुलगा गोविंदराव हायस्कूलमध्ये व्यवसायभिमुख शिक्षण विभागाकडे व्याख्याता आहे.