कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महानगरपालिकेचे ३५०० हून अधिक कर्मचारी २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती महानगरपालिका कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी दिली. शिक्षण मंडळ व केएमटीचे कर्मचारी टप्प्याटप्प्याने या संपात सहभागी होणार आहेत.

झाडू व सफाई कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना नियुक्तिपत्रे द्यावीत, रिक्त जागा पदोन्नतीने व सरळ सेवेने भराव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, कचरा उठावसाठी पुरेशी वाहने द्यावीत, गणवेश त्वरित मिळावेत, हंगामी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक लाभ हवेत, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे यासह २३ मागण्यांच्या पूर्ततेसाठी महानगरपालिका कर्मचारी संघ प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसंबंधी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी संघाने ११ एप्रिल रोजी महापालिका प्रशासनाकडे संपाची नोटीस दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनपाची विनवणी

उपायुक्त पंडित पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीस कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सरचिटणीस अजित तिवले, रवींद्र काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घ्यावा. मागण्यासंबंधी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले.