कोल्हापूर : कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीच्या समीप पोहोचली आहे. ३९ फूट ही इशारा पातळी काल ओलांडल्यानंतर दोन दिवसापूर्वी ओलांडल्यानंतर आता ती ४३ फूट या धोका पातळीजवळ पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता नदीची पाणी पातळी ४२ फूट ९ इंच इतकी होती. दरम्यान, पावसाने उघडीप दिली असली तरी शहरात पुराचे पाणी येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन, महापालिका, आपत्ती यंत्रणा यांची रात्रभर पूर नियंत्रणासाठी धावपळ सुरू होती. कागल तालुक्यात पुरात अडकलेल्या ट्रक चालक, क्लीनरची सुटका आपत्ती व्यवस्थापन पथकाने केली.
कोल्हापूरमधून कसबा बावडा मार्गे शियेला जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग येजा करण्यासाठी वापरवा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली-केर्ले तसेच हॉटेल ग्रीन फील्ड जवळ रजपूतवाडी या ठिकाणी अंदाजे दीड फूट पुराचे पाणी आल्याने सदरचा मार्ग वाहतुकीसाठी वडणगे फाटा येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पर्यायी मार्ग कोल्हापूर- वाठार-वारणानगर-मार्गे-बोरपाडळे हा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी अमोल येडगे हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांच्या समवेत रात्रभर नागरिकांच्या मदत व बचाव कार्यात उतरले होते. पुराचा धोका ओळखून स्थलांतर व्हा, जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे, अशा शब्दांत आवाहन करून जिल्हाधिकारी येडगे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने रात्री ११ वाजल्यापासून कोल्हापूर शहर, कोल्हापूर पन्हाळा महामार्ग तसेच आंबेवाडी व चिखली या दोन्ही गावांमध्ये त्यांनी पूरस्थितीची पाहणी केली. तसेच पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार करवीर स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
पुरात अडकलेल्या ट्रक चालक, क्लीनरची सुटका
कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवर आणूर – बस्तवडे रस्त्यावर ट्रक चालक व क्लीनर या दोघांनी पुराच्या पाण्यामुळे रस्ता बंद असतानाही रस्त्यात लावलेले लोखंडी कठडे बाजूला करून नदीच्या पाण्याच्या दिशेने निघाले. त्यांचा ट्रक पाण्यात बंद पडला. पुराच्या पाण्याने वेढलेल्या ट्रकवर हे दोघेही चढून उभे होते. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होत होता. पण ते दोघेही पुरात अडकल्यामुळे बाहेर पडू शकत नव्हते. पोलीस व ग्रामस्थ या ठिकाणी पोहचले. अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पथकाच्या स्वयंसेवकांनी ट्रक चालक व क्लिनर या दोघांची सुखरूप सुटका केली.
महापालिकेची यंत्रणा सज्ज
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुराचे पाणी येणाऱ्या भागांमध्ये महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी रात्रभर नागरिकांच्या मदतीस व स्थलांतरित होण्यासाठी गस्त घालून फिरत होते. पुराचा धोका ओळखून वेळेत स्थलांतर व्हा असे अग्निशमन विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येत होते त्यांनी सुतार वाडा, व्हीनस कॉर्नर कल्याण ज्वेलर्स, शाहूपुरी कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल पाठीमागील भाग, बापट कॅम्प अनंतपुरम अपार्टमेंट, जाधव वाडी कदमवाडी रोड, बावडा शिये रोड, उलपे मळा, सीता कॉलनी, विन्स हॉस्पिटल परिसर या भागात गस्त घालून नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित होणे बाबत आवाहन करण्यात आले. सुतारवाडा येथील १२ कुटुंबातील ५१ नागरिकांचे स्थलांतर चित्रदुर्ग मठांमध्ये करण्यात आले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी रात्री शहरांमध्ये फिरती करून निवारा केंद्राच्या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांच्या सोयीसुविधाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत त्यांनी रात्री कसबा बावडा शिये रोड, गायकवाड वाडा, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी इथे आलेल्या पुराच्या पाण्याची पाहणी करून महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली.