कोल्हापूर : यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वर्ष असल्याने लक्ष्मी पावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांनी गणरायाला जल्लोषात निरोप देण्याची तयारी केली असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासन, पोलिसांनी त्यावर निर्बंध लादले असताना यंदाचे विसर्जन कसे पार पडणार हे लक्षवेधी ठरले आहे. दरम्यान, या मिरवणुकीत मंडळांकडून ‘आवाजाच्या भिंती’, प्रखर प्रकाशझोत याचा वापर होतो आहे का यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
गेले दहा दिवस मांगल्याचा सण असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने मंडळांच्या वतीने गणरायाला निरोप दिला जाणार आहे. गणेश आगमनाच्या दिवशी ‘आवाजाच्या भिंती’, प्रखर प्रकाशझोत याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. तथापि बहुतांश मंडळांनी वाद्याच्या भिंती, विजेचा त्रासदायक लखलखाट याची योजना केली होती. अशा मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. आताही विसर्जनादिवशीही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. पण मंडळांनी अधिकच जल्लोषात मिरवणूक काढण्याची तयारी चालवली असल्याने मिरवणुका अडथळ्याविना पार पडणार का, याकडे लक्ष वेधले आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतींभोवती लोखंडी कठडे उभारून सूचना फलक लावण्यात आले आहेत.
पावसाने विश्रांती दिल्याने विसर्जन मार्गावरील खड्ड्यांवर युद्धपातळीवर डांबरी पॅचवर्क करण्यात येत आहे. इराणी खण व विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गावर बॅरिकेड, वॉच टॉवर, विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.
जय्यत तयारी
१०० टेंपो, ४१५ हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम, ६ ॲम्बुलन्स व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून विसर्जन मार्ग व स्थळांवर साफसफाईसाठी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. अर्पण केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य इराणी खणीमध्ये पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
पानसुपारीची व्यवस्था
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे विविध संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. पर्यायी विसर्जन मार्ग हॉकी स्टेडिअम येथेही स्वागत कक्ष उभारण्यात येत असून श्रीफळ, पान, सुपारी व एक रोप देण्यात येणार आहे.