कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर अत्यंत धैर्याने, नियोजनबद्ध तयारी करून तारदाळ ( तालुका हातकणंगले) येथील प्रियांका निलेश खोत यांची सैन्य दलात नियुक्ती झाली आहे. त्यांना चेन्नई येथे झालेल्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमी मध्ये पासिंग आऊट परेड मध्ये त्यांना लेफ्टनंट पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रियंका खोत यांनी अत्यंत समर्थपणे केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.

प्रियांका खोत यांच्या सैन्य दलातील या प्रवासाविषयी सांगताना त्यांचे दीर अशोक खोत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ७ नोव्हेंबर २०२२ रोजी निलेश खोत यांचे सैन्य दलात असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर प्रियंका खचल्या होत्या. निराशेच्या गर्तेत गेलेल्या प्रियंका यांना कुटुंबीयांनी तसेच ब्रह्माकुमारी केंद्र यांनी सावरण्यास मदत केली.

निलेश खोत हे सैन्य दलात असल्याने सैन्य दलाविषयी प्रियांका खोत यांना बरीचशी माहिती होती. त्यांनी सुरुवातीला बँकिंग स्पर्धा परीक्षा देण्याचे तयारी केली होती . परंतु सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनी सैन्य दलात सहभागी होण्याची संधी कशी आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता असल्याचेही जाणवून दिले. त्यानुसार प्रियांका यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी नोएडा येथे चार महिने विशेष प्रशिक्षण घेतले.

सैन्य दलात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्या ११ महिन्याच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या. आणि आता त्या उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य दलात सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. २६ सप्टेंबर पासून त्या सैन्य दलात प्रत्यक्ष सेवा बजावणार आहेत. गुवाहाटी येथे त्यांना प्रथम सेवा करण्याची संधी मिळालेली आहे.

प्रियंका खोत यांना सैन्य दलात सहभागी होण्याची संधी मिळाल्यावर खांद्यावर बॅच लावण्याची संधी सासू कांता अशोक खोत व आई संगीता रावसाहेब पाटील यांना मिळाली. प्रियांका खोत यांचे शिक्षण एम. कॉम. इतके झाले आहे. त्यांचे माहेर दत्तवाड (तालुका शिरोळ) येथे आहे. त्यांना एक मुलगी आहे. ती पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे पहिलीच्या वर्गात शिकते. घरी सासू, मुलगी, दीर, जाऊ असा परिवार आहे.

निलेश खोत यांच्या विषयी

तारदाळ गावातील निलेश अशोक खोत हे सैन्य दलात सेवा बजावत होते. सन २०२२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्ली येथील सिग्नल रेजिमेंट रँक (एन के) येथे सेवा बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यातच त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव तारदाळ गावात आणले होते. तेथे शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली होती. लोकप्रतिनिधी , लष्करी – पोलीस अधिकारी , देशप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत शासकीय ईतमामात निलेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सैन्य दल व पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली होती. श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव दिवसभर बंद ठेवून गावकरी व उपस्थित होते. अखेरचा निरोप देऊन दुखवटा पाळला होता.