दयानंद लिपारे
सध्या जगभरात करोनाविरुद्धच्या लढाईत ‘व्हेंटिलेटर’ची चर्चा मुख्यत्वे सुरू आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कमी संख्येने असलेल्या या यंत्रणेबाबत सगळीकडेच धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथील वस्रनगरीतील युवा उद्योजकांनी सर्वंकष निकषांचा विचार करून कमी खर्चात उपयुक्त ठरणारा ‘व्हेंटिलेटर’ बनविला आहे. करोनाच्या साथीत रुग्णांचा प्राणवायू ठरू शकणाऱ्या या ‘व्हेंटिलेटर’चे नाव ‘वायू’ असे ठेवण्यात आले आहे.
इचलकरंजीतील ‘गणेश क्वालिटी मशिन्स’चे गणेश डी. बिरादार यांनी उद्योजक, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अभ्यासक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने उपलब्ध साहित्यात अवघ्या पाच दिवसात व्हेंटिलेटर बनविला. एकमेकांशी दूरध्वनीवरून माहितीची देवाणघेवाण करत ‘व्हेंटिलेटर’चा ‘प्रोटो टाईप’ बनवला.
शासनाच्या निकषानुसार त्यामध्ये आवश्यक बाबींचा विचार करून त्याप्रमाणे काही ‘डिझाइन्स’ तयार केले. या कामी डॉ. सत्यनारायण वड्डीन, डॉ. केतकी साखरपे यांनी वैद्यकीयदृष्टय़ा आवश्यक माहिती पुरवली.
व्हेंटिलेटर निर्मिती प्रक्रियेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा योग्य समन्वय साधत रुग्णाला देण्यात येणाऱ्या श्वसनाच्या हवेचे प्रमाण, त्याचा वेग आणि दाब (प्रेशर) यांचा योग्य मेळ घालण्यात आला आहे.
मशिनचा मेकॅनिकल विभाग स्वत: मिलिंद बिरादार व संतोष साधले यांनी, इलेक्ट्रॉनिक्स विभाग सुभाष तंगडी आणि प्रा. धनश्री बिरादार यांनी सांभाळला. उपलब्ध सुटय़ा भागांचा वापर करून कमीत कमी किमतीत आणि रुग्णांच्या गरजा पूर्ण करणारे असावे असे ध्येय ठेवले होते. केवळ अतिदक्षता विभागच नव्हे तर जनरल वॉर्डसह रुग्णवाहिकेतही त्याचा सहजपणे वापर करता येऊ शकेल असा हा ‘व्हेंटिलेटर’ आहे. या व्हेंटिलेटरचे अनावरण अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे, मुंबई, नागपूर येथे करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. इटली, अमेरिकासारख्या विकसित देशात ‘व्हेंटिलेटर’ची गरजेइतकी उपलब्धता नसल्यामुळेच करोना बाधितांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर गरज लक्षात घेताच या चमूने ‘व्हेंटिलेटर’ बनविण्याचा संकल्प घेतला आणि अवघ्या पाच दिवसांत तो सिद्धीसही नेला.