कोल्हापूर : निव्वळ स्टंटबाजीसाठी दातृत्वाची भाषा करणारे राजू शेट्टी करोना संसर्ग, महापूर काळात कोणत्या बिळात लपले होते, हे जनतेने पाहिले आहे. त्याच मुळे लोकसभा निवडणुकीत ते अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत, असा खोचक टोला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे लगावला आहे.
महाभयंकर करोना आणि दोन्ही महापुराच्या गंभीर परिस्थितीवेळी रस्त्यावर उतरून लोकांची सेवा केली आहे. देव-धर्मासाठी, जनतेसाठी काय दान केले आहे, हे जनतेला माहीत आहे. या कामाचे मोल समजण्याएवढी शेट्टी यांची बुद्धिमत्ता नाही. दलबदलू व्यक्तीने शेतकरी बांधवांच्या जिवावर सत्ता भोगली. त्यांनाच बाजूला करत सध्या कारखानदारांशी युती केली आहे, अशी टीका त्यांनी केली.
माझ्या वडिलांच्या वैद्यकीय बिलाचे आरोप त्यांनी सिद्ध केल्यास मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घ्यायला तयार आहे. ते सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी राजकीय जीवनाचा संन्यास घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.