कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक शासनाने आर्थिक निधीची तरतूद करून या दिशेने प्रवास सुरू ठेवला आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात महापुराची तीव्रता वाढणार असल्याने केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने कर्नाटकला खडसावले पाहिजे, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी व्यक्त केली.
कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या विरोधात महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे तक्रार केलेली आहे. तथापि, याबाबत पुढे फारशा हालचाली झालेल्या नाहीत. दरम्यान, कर्नाटक शासनाने आता अलमट्टी धरणाच्या कामासाठी भांडवली खर्चाची तरतूद केली आहे. भूमी संपादनासाठी निधी मंजूर केला आहे. आपले उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारचे प्रयत्न हळूहळू सुरू आहेत, याकडे लक्ष वेधून शेट्टी म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण नदीकाठच्या ग्रामीण भागातील नागरिक, ग्रामस्थांच्या घरादारावर नांगर फिरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गप्प बसून चालणार नाही. आयआयटी रूरकी यांनी अलमट्टी धरणामुळे महापुराचा प्रश्न वारंवार उद्भवतो, असा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला आहे. तो केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाने डोळ्याखाली घातला पाहिजे. कर्नाटक सरकारला कडक शब्दांमध्ये उंची वाढीचे धोरण थांबवण्यासाठी सुनावले पाहिजे. अन्यथा हे धरण कोल्हापूर -सांगली भागातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून विरोध होत आहे. शिरोळ तालुक्यात मे महिन्यात हा प्रश्न ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी बंद पाडून आपल्या भावनांचे दर्शन घडवले होते. कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये महापुराची तीव्रता वाढणार असल्याने याला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने शिरोळ तालुक्यातील अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. माजी आमदार उल्हास पाटील, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील यांनी सतत येणाऱ्या महापुराची नेमकी कारणे कोणती आहेत, याचे उत्तर तज्ज्ञांनी, राज्य शासनाने दिली पाहिजेत, अशी मागणी केली. रजनी मगदूम, सावकर मादनाईक, सुनील इनामदार, रावसाहेब आलासे, वैभव उगळे, बाबासाहेब नदाफ, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पवार, सर्जेराव पाटील आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.