कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने माझ्याविरोधात कटकारस्थान करून माझा पराभव करण्यासाठी खटाटोप करत आहेत. मात्र त्यांच्या कोणत्याच कारस्थानास बळी न पडता सामान्य जनतेच्या पाठबळावर माझा विजय निश्चीत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दत्तवाड येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना केले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की २००९ प्रमाणे सामान्य जनतेने माझी निवडणूक हातात घेतली असून प्रचाराची यंत्रणा गतिमान केली आहे. लोकांनी लोकवर्गणी गोळा करून एक व्होट व एक नोट प्रमाणे देशामध्ये लोकशाहीचे बळकटीकरणाचा आदर्श पुन्हा एकदा हातकंणगले लोकसभा मतदारसंघातील जनता घडवून आणत आहे. आज दत्तवाड गावाने पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची लोकवर्गणी देवून चळवळीला व या लढ्यास बळ दिले आहे. सामान्य जनता राजकारणाला कंटाळली असून सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा…छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

महागाई , बेरोजगारी , शेतीमालाचे पडलेले दर , औद्योगिक क्षेत्रात आलेली मंदी व त्यामुळे झालेले नुकसान , शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, समाजा – समाजात निर्माण होत असलेले तेढ यामुळे जनता मेटाकुटीस आलेली आहे. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी स्वच्छ व प्रामाणिक चेहऱ्याची आवश्यकता असून विरोधकामधील बरबटलेले उमेदवार स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी धडपडत आहेत.मतदारसंघातील सर्व कारखानदार एकत्र येवून षडयंत्र रचत आहेत.

हेही वाचा…रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून

महायुती व महाविकास आघाडीतील कारखानदार एकच असून शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात येवू लागल्या आहेत. यामुळे या निवडणूकीत जनता या नेत्यांनी त्यांची जागा दाखविणार असल्याचे शेट्टी म्हणाले. यावेळी प्रा.डॉ. जालंदर पाटील , सावकर मादनाईक , यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीस ऊपस्थित होते.