कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठांमध्ये पीएच. डी. संशोधनाच्या नावाखाली धूळफेक चालू आहे. इतरांनी केलेले संशोधन आपलेच आहे असे भासवले जाते. यामध्ये कॉपीपेस्टचा सर्रास वापर चालतो, असा आरोप डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये केला.

शिवाजी विद्यापीठ वर इतर राष्ट्रीय इतर प्रयोगशाळेमध्ये चालणार चालणारे आक्षेपार्ह संशोधन, डॉक्टरेट पदवी व प्राध्यापक भरती यामधील गैर व्यवहार यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. सूक्ष्म जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, मानसशास्त्र या विषयात अर्हता प्राप्त केलेले डॉ. कापशीकर यावेळी म्हणाले, गेली १८ वर्ष विद्यापीठातील प्राध्यापक भरती विषयी जे पाहिले ते चिंतनीय आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठ हेतूपूर्वक जाहीर करत नाही. गोपनीयतेच्या नावाखाली माहिती लपवली जाते. विचारणा केल्यास माहिती देण्यास विद्यापीठ बाध्य नाही असे उत्तर प्रशासनाकडून दिले जाते. भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी कुलगुरूंकडे विनवणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांना याची जाणीव करून दिली असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

विकतचा प्रबंध

पीएचडी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध असताना पीएचडीचा अभ्यास करणारे विद्यार्थी निवडले जातात. एकाच वेळी पूर्ण वेळ नोकरी व पूर्ण वेळ पीएच. डी. चा अभ्यास असे कसे काय होऊ शकते अशी विचारणा करून कापशीकर पात्र उमेदवारांना डावलले जात असल्याचा आरोप केला. विद्यापीठामध्ये पीएच. डी. संशोधक विद्यार्थी संशोधनाची विदा जतन करतात की नाही याबाबत शंका उपस्थित करून ते म्हणाले काही संशोधक विद्यार्थी प्रबंध विकत घेतात असे दिसते. बऱ्याच सुविधा विद्यापीठांमध्ये नसताना संशोधन कसे चालते ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. संशोधनाचा दर्जा खूपच खालावलेला आहे. याबाबतच्या तक्रारी विविध आयोगांकडे केले असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठाला जाग

दरम्यान डॉ. राजवर्धन कापशीकर यांनी विद्यापीठाच्या संशोधना संदर्भात आरोप केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाला जाग आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने संशोधन निबंध संदर्भात निबंधांच्या शिक्षक, मार्गदर्शक यांना म्हणणे मांडण्यासाठी यापूर्वी कळवले आहे. त्यांचे म्हणणे प्राप्त झाल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर विद्यापीठ पुढील चौकशीसाठी दिशा निश्चित करेल. संशोधनाच्या दर्जाबाबत गैरप्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही, असे विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.