रिक्षा परमीट नूतनीकरणासाठी नवीन अधिसूचनेनुसार पाचपट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. तर मुदतबाह्य परवान्यास प्रतिमहिना पाच हजार रुपये शुल्क भरण्याचा अन्यायी निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अधिसूचनेद्वारे घेण्यात आला. नवीन अधिसूचनेनुसार पूर्वी परवाना नूतनीकरणासाठी २०० रुपये भरावे लागणारे शुल्क आता एक हजार भरावे लागणार आहे. या अन्यायी दरवाढीविरोधात सर्व रिक्षा संघटना एकवटल्या आहेत. शनिवारी या प्रश्नी गांधी मैदान येथे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड येथील रिक्षाचालकांची संयुक्त बैठक पार पडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालावे. त्यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत रिक्षा संघटनेची बैठक बोलवावी, अशी मागणी बठकीत केली. तसेच मंगळवारी या प्रश्नी सर्व रिक्षाचालकांनी सासने मदान येथून परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांना देण्यात येणार आहे.
बैठकीला सुभाष शेटे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, राजू पाटील, गौरीशंकर पंडित, मधुसूदन सावंत, शिवाजी पाटील, विश्वास नांगरे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.