कोल्हापूर : राज्य शासन कर्जात बुडालेले आहे. तरीही ८६ हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास केला जात आहे. महायुतीचे नेते खासगीत शक्तिपीठ नाकारतात. पण दहशतीमुळे बोलत नाहीत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस भवनात झाला, यावेळी ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, आनंद माने, राजेश लाटकर, तौफिक मुलाणी, दुर्वास कदम, अमर समर्थ आदींची भाषणे झाली.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राज्याची आर्थिक घडी बिघडली आहे. ठेकेदारांची कोट्यवधीची देयके थकीत आहेत. यामुळे ठेकेदारांनी कामे घेताना दहा वेळा विचार करावा, अशा शब्दांत आमदार पाटील यांनी महायुतीच्या कारभारावर टीका केली.
त्यांचा करेक्ट कार्यक्रम
महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना ज्यांना जायचे त्यांनी जावे. शेवटच्या टप्प्यात तिकडे जाऊन बसवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसे करणारे हे माझे लक्ष्य असेल. अशांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला.
बंटी पाटलांची फॅक्टरी
ज्यांना मोठे केले ते सोडून गेले. त्याचे वाईट वाटत नाही. बंटी पाटील म्हणजे माणसे तयार करणारी फॅक्टरी आहे. काँग्रेस एकनिष्ठ म्हणून काम करा. महायुतीला शून्यावर आणून महापालिकेत काँग्रेसचा महापौर करणे हे लक्ष्य असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.