कोल्हापूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी मागणी शिंदे गटाच्या महिला आघाडीने केली आहे. याबाबतच निवेदन शिंदे गटाच्या महिला आघाडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांना गुरुवारी सादर केले. त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जयप्रभा स्टुडिओ प्रश्नी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केल्यानंतर आता शिंदे गट पुढे आला आहे. माजी नगरसेवक संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकी दरम्यान प्रतिज्ञापत्रात कोट्यवधींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे. एका व्हिडीओ गेम पार्लरवर एवढी संपत्ती कशी मिळवली असा संशय व्यक्त केला आहे.
म्हणून भ्रष्टाचार वाढला
पवार हे पद्मा टॉकीज चौक येथील दुकान गाळ्यामध्ये बसून नागरिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांना विविध कारणे काढून, धमकावून हप्ते वसूल करतात. गुंडगिरीच्या भीतीतून व्यावसायिक, व्यापारी पवार आणि त्यांच्या टोळक्यांना पैसे देवून कर्जबाजारी होत आहेत पवार आणि टोळी गेली अनेक वर्षे विविध शासकीय कार्यालयात प्रसिद्धी पोटी केलेल्या आंदोलनानंतर त्यात तोडपाणी करून अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे काम करीत असल्याने शासकीय कार्यालयातही भ्रष्टाचाराची टक्केवारी वाढली आहे,असा गंभीर आरोप महिला आघाडीने केला आहे. यावेळी महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, शहरप्रमुख.पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, गौरी माळतकर आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.