कोल्हापूर : दोन माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सचिव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक-नगरसेविकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत या सर्वांचे स्वागत करण्यात आले आहे. या दिग्गजांच्या प्रवेशाने भाजपाला आणखी बळकटी मिळाली असून महानगरपालिकेत पक्षाची सत्ता येण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजपात जोरदार प्रवेशसत्र सुरू झाले आहे. विविध राजकीय पक्षांतील अनेक दिग्गज नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

त्याच अनुषंगाने मुंबईतील भाजपा कार्यालयात माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव, रवी रजपुते, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव विठ्ठल चोपडे, माजी नगरसेविका शुभांगी माळी, दीपाली हुक्किरे, माजी नगरसेवक तानाजी हराळे, श्रीकांत कांबळे, राजू खोत यांच्यासह प्रधान माळी, सचिन हुक्किरे, रवी कांबळे, शहाजान मुजावर, विष्णू नाकिल आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

या सर्वांच्या गळ्यात पक्षाचा स्कार्फ घालून भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. आगामी महापालिकेवर भाजप – महायुतीचाच झेंडा फडकणार, पहिला महापौर आपलाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली गतिमान झाल्या असून अनेक दिग्गज मंडळींनी भाजपात प्रवेश केला असून अद्यापही अनेक माजी नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते संपर्कात आहेत. या सर्वांचाही भाजपा प्रवेश लवकरच होणार आहे, असे आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक तथा जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, रफिक खानापुरे आदी उपस्थित होते.

पहिल्या वहिल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यानिमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. तर प्रभावी नेतृत्व आणि अनुभव संपन्न नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची स्थानिक पातळीवरील ताकद आणखी मजबूत झाली आहे. या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजी महापालिका निवडणूक लढवत असताना भाजपला सर्वांत मोठा प्रतिसाद मिळून हा प्रथम क्रमांकाचा पक्ष सभागृहात असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.