कोल्हापूर: कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढवणार आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये महापुराची तीव्रता वाढणार असल्याने याला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने रविवारी अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका दुपारपर्यंत बंद ठेवून वाहन ताफ्यासह आंदोलन स्थळी जाण्याचा निर्णय गुरुवारी एका बैठकीत घेण्यात आला.
संघर्ष समितीच्या वतीने श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी जनतेने अलमट्टी धरण उंची वाढप्रश्नी जिद्दीने विरोध करावा. मनमोकळेपणाने एकत्र येऊन कर्नाटक शासनाला जाग येईल असे आंदोलन करूया, असे आवाहन केले.
माजी आमदार उल्हास पाटील यांनी सतत येणाऱ्या महापुराची नेमकी कारणे कोणती आहेत याचे उत्तर तज्ज्ञांनी राज्य शासनाने दिली पाहिजेत, अशी मागणी केली. रजनी मगदूम, सावकर मादनाईक, सुनील इनामदार, रावसाहेब आलासे, वैभव उगळे, बाबासाहेब नदाफ, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पवार, सर्जेराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले.