कर्नाटक नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिवसैनिकांनी पुणे — बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ त्याच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी शिवसैनिकांनी ‘आम्ही कर्नाटकात येतो, हिंमत असेल तर गोळ्या घाला’, अशा शब्दांत पाटील याला आव्हान दिले.
भीमाशंकर पाटील याने ‘मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला’ असे वादग्रस्त विधान केले होते. याचे तीव्र पडसाद उमटत असून महाराष्ट्रात सर्व स्तरातून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत आज कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, संभाजीराव भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील, किरण कुलकर्णी, विद्या गिरी आदी शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटीलच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कागल जवळ त्याच्या पुतळ्याचे दहन करीत संताप व्यक्त केला.
