लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या १०० कोटीच्या निधीतील रस्ते कामातील सावळा गोंधळ पुन्हा समोर आला आहे. या रस्ते कामातील त्रुटींना कारणीभूत धरून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत १०० कोटीच्या निधीतून १६ मुख्य रस्ते केले जाणार आहेत. मात्र हे काम वेगवेगळ्या कारणांनी सतत गाजत आहे. या रस्ते कामातील लोकप्रतिनिधी- महापालिका अधिकाऱ्यांची टक्केवारी प्रकरणामुळे महापालिकेची पुरती बदनामी झाली आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरातील पाच बडी रुग्णालये अडचणीत; जैव वैद्यकीय कचराप्रकरणी दंड ठोठावला

या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांचीच कान उघाडणी केली होती. लगेचच, शहरातील मिरजकर तिकटी ते नांगीवली चौक या रस्त्यावर डांबरीकरण होऊन पुन्हा खुदाई झाल्याने महापालिकेच्या कामाचे धिंडवडे निघाले होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्त्यांच्या कामाची वर्क ऑर्डर सोलापूर येथील ठेकेदार मे.एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नांवे मंजूर आहे. या मंजूर १६ रस्त्यांपैकी ५ रस्त्याची कामे ठेकेदारामार्फत सुरु आहेत.

महापालिका प्रशासनाला जाग

यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसत आहे. प्रशासकांनी आज या रस्ते कामाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत केली. रस्ते तयार करत असताना पाणी योजना, मलनिस्सरण, विद्युत कामे या महापालिके अंतर्गत कामांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांची प्रशासकांनी संवाद साधला तेव्हा तक्रारींचा मारा करण्यात आला. त्या आधार प्रशासकांनी वरील तिघा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रस्ते कामे दर्जेदार, मुदतीत,निविदेत उल्लेख केलेल्या अटी प्रमाणे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच रस्तेवर अथवा गटारीमध्ये पाणी तुंबून कोणाच्याही घरात जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या.

आणखी वाचा-कोल्हापूर : इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले; एका घोड्याचा बळी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकच रस्ता पूर्ण

या ५ रस्त्यांपैकी निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड याचे रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण करणेचे काम पूर्ण केलेले आहे. कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक या रस्तेचे खडीकरण पूर्ण झालेले आहे. माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्वजित हॉटेल या रस्तेचे युटीलिटी शिफटींग व खडीकरणाचे काम सुरू आहे.