कोल्हापूर : रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या नियोजनात अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे पदाधिकारी व रायगड जिल्हा प्रशासनाने ‘शिवभक्त’ म्हणून हातात हात घालून काम करावे, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी येथे सोमवारी केले. शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी समिती व जिल्हा प्रशासनाच्या आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. रायगडावरील हत्तीखाना येथे बैठक झाली.

यावेळी संयोगिताराजे म्हणाल्या, “युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शेकडो मावळ्यांना घेऊन सुरू केलेला शिवराज्याभिषेक लोकोत्सव झाला आहे. लाखो शिवभक्त गडावर येत असून, हा सोहळा जगभरातील लोकांपर्यंत पोचला आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्ताला कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. समितीचे पदाधिकारी असोत किंवा शासनाचे अधिकारी दरवर्षी शिवभक्त म्हणून गडावर सेवा देत असतात. यंदाही त्यांनी शिवभक्त म्हणून काम करण्याची आवश्यकता असून, त्यात ते तसूभरही कमी पडणार नाहीत, असा विश्वास आहे.”

हेही वाचा – VIDEO : कोल्हापुरातही भरधाव मोटारीने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

समितीचे पदाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी समन्वय साधून शिवभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच समितीच्या वतीने प्रशासनाला आवश्यक मागण्यासंदर्भात केलेल्या सूचनांसंदर्भात प्रशासनाने त्यावर कोणते उपाय शोधले, याची माहिती घेतली. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांनी शिवभक्तांसाठी सुविधांचा आढावा घेण्यात आला. वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, गर्दी नियंत्रण, पार्किंग, पाणीपुरवठा, सोशल मिडिया, शौचालय, वीज पुरवठा, अग्निशमन पथक अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा – कोल्हापुरात ११ वाजता कल निश्चित होणार; मतमोजणी यंत्रणा सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस सोमनाथ घार्गे – जिल्हा पोलीस प्रमुख, रायगड अतुल झेंडे -अपर पोलीस अधीक्षक, रायगड, एम.आर.नामदे, सत्यजित बडे – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय वेंगुर्लेकर – कार्यकारी अभियंता, शंकर काळे – उपविभागीय पोलीस अधिकारी, आर.जे.पाटील, संजीवनी कट्टी, दिपक घोडे, मनीषा घोडे, संदीप खांडेकर, हेमंत साळुंखे, आदी समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.