कोल्हापूर : महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद दिल्यानेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनातर्फे आयोजित ‘कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया : भाग-२’ या डॉ. भारती पाटील संपादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ‘स्त्री सक्षमीकरण : आव्हाने व संधी’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सरोजमाई पाटील प्रमुख उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ‘राज्याची, देशाची आर्थिक घडी बसविण्यामध्ये महिलांचा धोरणात्मक निर्णयप्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होणे आवश्यक आहे. स्त्री मुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना पुरुषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांमुळे या देशात स्त्री-पुरुष समतेचे आणि स्त्री सन्मानाचे वारे निर्माण झाले असल्याने या प्रवासात आपण पुरुषांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे.
सरोज पाटील यांनी मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जीवनसंघर्षाबद्दलही उपस्थितांना अवगत केले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर, ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
पुस्तकाविषयी – डॉ. भारती पाटील यांनी संपादित केलेल्या या ४०० पानांच्या पुस्तकात कोल्हापुरातील स्वातंत्र्य चळवळीसह शैक्षणिक, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या ३४ स्त्रियांच्या कार्याचा वेध घेण्यात आला आहे.