कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी महिन्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेने केलेला रस्ता पुन नादुरुस्त झाल्याने आता त्यांच्याच आगमनावेळी तो आणखी एकावर दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या गलथान, निकृष्ट कामकाजाचा नमुना या निमित्ताने पुढे आला आहे.१३ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी आले असता कार्यक्रमस्थळी अत्यंत खराब झालेला रस्ता मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार म्हटल्यावर तातडीने दुरुस्त करण्याची तत्परता महापालिकेने दाखवली. ठेकेदारांकडून काम दर्जेदार होत नसल्याने स्वतःची बांधकाम विभागाची यंत्रणा कामी लावून रस्ता तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कामही किती निकृष्ट दर्जाचे आहे याची प्रचिती आता येत आहे.

मंत्र्यांच्या निवासस्थानाकडचा रस्ता

कोल्हापुरात रस्ते खराब झाली की महापुराकडे बोट दाखवण्याची चतुराई प्रशासन दाखवत असते. यावर्षी कोल्हापुरात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. तरीही मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी दुरुस्त केलेला हॉकी स्टेडियम ते कळंबा कारागृह हा वर्दळीचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता महिन्याभरातच पुन्हा उखडला आहे. शिवाय, या मार्गावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान असल्याने ते नेहमीच या रस्त्याचा नेहमीच वापर करीत असतात. आधीच शहरांमध्ये मलनिसारण, गॅस पाईपलाईन, पाणीपुरवठा यासाठी गल्लोगल्ली रस्त्यांची खुदाई केली असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तर जे रस्ते तयार केले त्याची वाताहात होत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना

नाले- गटारीतून आलेले पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता खराब झाला आहे. तो सिलकोट टाकून दुरुस्त केला आहे. पाणी येणारा भाग खाजगी मालमत्तेचा असल्याने महापलिकेच्या मर्यादा आहेत. यावर कायमचा मार्ग शोधला जात आहे, असे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.