कोल्हापूर : कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारली तरी बुधवारी बेळगावात काळा दिनाच्या फेरीत हजारो मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहेत. फेरीच्या मार्गावर बंद सदृश्य परिस्थिती होती.संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार फेरीत करण्यात आला. भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या मराठी भाषिकांतर्फे बुधवारी काळा दिन पाळला  काळा दिनाच्या फेरीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा, पोलीस प्रशासनाकडे रितसर परवानगी मागण्यात आली होती. प्रशासनाने शेवटपर्यंत परवानगी देणार नाही अशी आठमुठी भूमिका घेतली.

हेही वाचा >>> साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे निधन

मराठी भाषिकांनी आपला निर्धार कायम ठेवत दडपशाही झुगारून हजारोंच्या संख्येने काळा दिनाच्या फेरीत सहभाग घेतला आहे. सर्वत्र निषेधाची काळी कपडे घातलेल्या मराठी भाषिकांची गर्दी दिसून आली. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येत आहे.बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल, तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार फेरीच्या माध्यमातून करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते, कार्यकर्त्यांसह बालचमू आणि युवावर्ग प्रचंड संख्येने फेरीत सहभागी झाला होता.