पुणे जिल्ह्य़ात पडत असलेल्या पावसामुळे तेथील बंडगार्डन येथून दौंडमार्गे सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. काल रविवारी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग १८ हजारांपेक्षा जास्त होता, तर सोमवारी, दुसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग १६ हजार व नंतर १४ हजार क्युसेक्सपर्यंत कमी झाला. दरम्यान, धरण शंभर टक्के भरायला सुमारे ८२ टीएमसी पाण्याची गरज आहे.
काल रविवारी बंड गार्डनमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग कमी होत असताना दुसरीकडे हे पाणी प्रत्यक्षात उजनी धरणापर्यंत पोहोचण्यास आणखी काही तासांचा अवधी लागणार आहे. या धरणात सध्या केवळ वजा ५३ टक्के इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे. या धरणातील पाण्यावर सोलापूर शहरासह अनेक शहरे व गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
पुणे जिल्ह्य़ात जोमदार पडत असलेल्या पावसामुळे तेथून उजनी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग सध्या तरी खूपच कमी आहे. ४० ते ५० हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग राहिल्यास धरण भरण्यास मोठी मदत होणार आहे.
सोलापूर जिल्ह्य़ाने गेल्या सलग दोन वर्षांत दुष्काळाच्या संकटाचा कटू अनुभव घेतला असताना यंदा तिसऱ्या वर्षी तरी पावसाची साथ मिळावी व दुष्काळाचा पाठलाग थांबावा म्हणून येथील शेतक ऱ्यांसह आम जनतेने देव पाण्यात ठेवले आहेत. परंतु पावसाळा सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटत असला, तरी अद्यापि पावसाचा पत्ता दिसत नाही. त्यामुळे सोलापूरकर अक्षरश: धास्तावले आहेत. या पाश्र्वभूमीवर पुण्यात पडणाऱ्या पावसाकडे सोलापूरकर आशेने पाहत आहेत.