कोल्हापूर : ‘उल्लास’ नव भारत साक्षरता कार्यक्रमात २०२४-२५ या वर्षात कोल्हापूर शैक्षणिक विभागाने असाक्षर नोंदणी आणि साक्षरता परीक्षेत लक्ष्यभेदी कामगिरी केली आहे. या परीक्षेत राज्याचा निकाल ९८.७५ टक्के असून कोल्हापूर विभागाचा ९९.६३ टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याचा ९९.७३ टक्के लागला असल्याचे शनिवारी सांगण्यात आले.
कोल्हापूर शैक्षणिक विभागात कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. दहावी-बारावी बोर्ड परीक्षा, पाचवी आठवी शिष्यवृत्ती, एनएमएमएस शिष्यवृत्ती, राष्ट्रीय संपादनूक सर्व्हे, आधार नोंदणी व पडताळणी, अपार नोंदणी, पीजीआय यासह शिक्षण विभागातील बहुतांश मापदंडात कोल्हापूर विभाग राज्यात पुढे आहे.
मागील दोन वर्षांत कोल्हापूर विभाग उल्लासमध्ये पिछाडीवर होता. राज्य योजना कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे विभागाने असाक्षर नोंदणीचे, परीक्षेस बसविण्याचे राज्यस्तरावरून देण्यात आलेले उद्दिष्ट (लक्ष्य) ओलांडले आहे.उल्लास योजनेने गती घेतली आहे. अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे. नवसाक्षरांचे निरंतर शिक्षण सुरू राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. – राजेश क्षीरसागर, विभागीय समन्वयक उल्लास, तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर, कोकण मंडळ