कोल्हापूर : टेक्निकल टेक्स्टाईलचे बदलते जग कसे आहे हे समजून घेण्याची उत्सुकता, भावी वस्त्रोद्योग अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवलेले नव उद्यमी वस्त्र उत्पादनाची चिकित्सापूर्वक पाहणी, कापड रंग प्रक्रिया नव तंत्रज्ञानाचे बारकाईने अवलोकन, आपल्याच भागातील कामगार भेटल्यावर त्याच्याशी ममत्वाने केलेली हात मिळवणी… अशा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या भावमुद्रा वस्त्रनगरी इचलकरंजीतील दौऱ्यावेळी लक्षवेधी ठरल्या. केंद्रीय मंत्रिमंडळातील बडी असामी असतानाही मंत्र्यांचा साधेपणाचा वावर सर्वांनाच भावला. पहिल्याच भेटीत इचलकरंजीकर आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांचे जणू सुत जमले.

इचलकरंजीत वस्त्र निर्मितीच्या आधुनिकीकरणाची धागे बळकट होऊ लागले आहेत. अशातच नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भारत टेक्स या आंतरराष्ट्रीय वस्त्र प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्यापार मंत्री पियुष गोयल, वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी पाहणी केली होती. तेव्हा इचलकरंजीतील वस्त्र निर्मितीच्या आधुनिक विश्वाने त्यांना जणू मोहिनी घातली होती. त्यामुळे इचलकरंजीतील अत्याधुनिक वस्त्र उद्योगाचे उभे -आडवे धाग्यांचे विश्व डोळ्याखालून घालण्यासाठी मंत्री गिरीराज सिंग सोमवारी वस्त्र नगरी इचलकरंजीत आले होते.

दहा वर्षांपूर्वी इचलकरंजी पॉवरलूम मेघा क्लस्टरची सुरुवात झाली. संघर्षातून वाटचाल करत निघालेले या संस्थेला आता कुठे बाळसे येऊ लागले आहे. या संस्थेत संघ शिस्तीत वाढलेले मंत्री नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधीच आल्याने संयोजकांनाही आश्चर्य वाटले. गिरीराज सिंह यांनी या संस्थेतील अत्याधुनिक साइजिंग -प्रोसेसिंग या प्रक्रियेची माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, आदित्य स्वप्निल आवाडे, पंकज मेहता यांच्याकडून तपशीलवार माहिती दिली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल एक्सलन्स येथे भेट देऊन वेगवेगळ्या टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादनाची बारकाईने माहिती घेतली.

कामगाराशी मनमोकळी भेट

याचवेळी मंत्री सिंग यांच्याकडे मूळचा नवादा (बिहार) जिल्ह्यातून आलेला कामगार भेटला. आपल्याच मतदारसंघातील कोणी एक तरुण २ हजार किलोमीटर अंतरावर भेटल्याने सिंह यांना त्याच्याविषयी आपुलकी दाटली. त्यांनी या कामगाराला जवळ ओढून घेऊन विचारपूस केली. त्यानेही येथे पाच वर्षांपासून काम करत आहे. दीड -दोनशे बिहारी कामगार येथे काम करतात, अशी माहिती दिली. सिंग यांनी पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी येथे येऊन या लोकांशी संवाद साधण्याचे कबूल करीत निरोप घेतला.

तरुणाईशी जवळीक

डीकेटीई या वस्त्रोद्योग अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांशी मंत्री सिंह यांनी संवाद साधला. सॅनिटरी नॅपकिनचे शाश्वत उत्पादन, तागाची नवनवीन उत्पादने अशा नवउद्यमी उत्पादनांची मंत्री सिंह यांनी अगदी लक्षपूर्वक माहिती घेतली. उद्याच्या अभियंत्यांना काही प्रश्न विचारत त्यांना या उत्पादनाबद्दल नेमकी किती माहिती आहे याचाही अंदाज घेतला. शिवाय जाताना डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवल्याने तरुणाई भारावून गेली.

लग्न कधी करताय ?

मंत्री गिरीराज सिंह यांनी सकाळीच आदित्य स्वप्निल आवाडे यांच्याकडे लग्नाबद्दल विचारणा केली. संपूर्ण आवाडे परिवार उपस्थित असताना त्यांच्यासमोरच उघडपणे चौकशी केली. आदित्य यांनी विवाह लवकरच करू; तसेच शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण आवर्जून यावे, असे निमंत्रण स्वप्निल – वैशाली आवाडे या उभयतांनी दिल्यावर मंत्र्यांनी त्याचाही स्वीकार केला.

नवतंत्रज्ञानाधारे कापड निर्मिती करावी – गिरिराज सिंह

देशातील लोकसंख्या, निर्यात बाजारपेठ वाढतच राहणार आहे. वस्त्राची वाढती मागणी लक्षात घेऊन डीकेटीई संस्थेने नवनवीन संशोधन करून अधिकाधिक कापड उत्पादन कसे करता येईल, वस्त्रोद्यागाचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सोमवारी केली.

वस्त्रोद्योगातील समस्या सोडवून सरकारने प्रोत्साहन देण्याची मागणी वारंवार होत असते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी विविध वस्त्र निर्मिती संस्थांना भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर डीकेटीई महाविद्यालयातील टेक्स्टाईल विभागात पाहणी करून विद्यार्थ्यांशीही संवादही साधला.

येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सिंह म्हणाले, वस्त्रनगरी इचलकरंजी ही महाराष्ट्राची आण-बाण-शान आहे. कापूस उत्पादन होत नसतानाही येथे दर्जेदार, निर्यातक्षम वस्त्रनिर्मिती केंद्र म्हणून लौकिक निर्माण झाला आहे. आता एवढ्यावरच न थांबता मूल्यवर्धित वस्त्र उत्पादने तयार करण्याकडे लक्ष द्यावे.

माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी लवकरच दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांचे कापड निर्यात करणारे शहर म्हणून इचलकरंजी नावारूपास येण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीकेटीईचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, डीकेटीईच्या मानद सचिव सपना आवाडे, स्पप्निल आवाडे, रवी आवाडे, एस.एल. अडमुठे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले उपस्थित होते.