कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

नांदणी येथून महादेवी हत्ती नेत असताना जमावाकडून दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी धरपकड चालवली आहे. या प्रकरणातील संशयितावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार राहुल आवडी यांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या  मंगळवारी मुंबई येथे तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. 

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील हे खासदार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, विनय कोरे, अमल महाडीक, विश्‍वजित कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, राहुल आवाडे हे आमदार ,माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासो भगाटे, सागर पाटील, अ‍ॅड. मनोज पाटील उपस्थित होते.

बैठकीत पेटा ही संस्था आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोप करून बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांची सध्या काय परिस्थती आहे ,याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती २०२३ साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत. आज तो हत्ती तिथे आहे कि नाही याबाबत संशय निर्माण झालेला आहे.

या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जवळपास ४ ते ५ पाळीव हत्ती मयत झाले असल्याचे सांगितले. सदरची गंभीर गोष्टीबाबत राज्य सरकारने सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वनविभागास दिले.

पेटा व वनतारा यांच्याकडून माधुरी हत्ती घेऊन जाण्यासाठी षडयंत्र रचून न्यायव्यवस्था व प्रशासनाला बटीक करून वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. माधुरी हत्तीचे ११ वेळा वैद्यकीय तपासणी केली हे सर्व ११ अहवाल सकारात्मक आहेत. त्याबरोबरच कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक मठांना हत्ती घेऊन जाण्याबाबत नोटीसा देण्यात येत आहेत. यामुळे चांगल्या पध्दतीने देखभाल करूनही समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून हत्ती हे अनुसुचि १ म्हणजेच डोंगरी व कॅप्टीव्ह एलिफंट ( पाळीव हत्ती ) या दोन प्रकारात मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य सरकारने विशेष कायदा करणे आवश्यक असून राज्य सरकारने स्वतंत्रपणे कायदा करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली. राज्य सरकारने आज बैठक घेऊन सकारात्मकता दाखविली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्ती नांदणी मठात परत येणार नाही, तोपर्यंत अंबानी उद्योग समुहाच्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक , राजस्थान , मध्यप्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.