लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, बारामती या लोकसभा मतदारसंघांमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ४ जूनला होणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर महायुती, महाविकास आघाडी तसेच अन्य पक्षांनी जागावाटप, उमेदवार निश्चितीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
असा आहे कार्यक्रम
या सर्व लोकसभा जागांसाठी निवडणूक अधिसूचना १२ एप्रिल रोजी जाहीर होणार असून १९ एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील. २० एप्रिल रोजी निवडणूक अर्जदारांची छाननी होणार असून २२ एप्रिल रोजी उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. ७ मे रोजी मतदान होईल, तर मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
आणखी वाचा- संजय मंडलिक यांचे शरद पवारांविषयीचे विधान बालिश – प्रशांत जगताप
जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच
दरम्यान , पश्चिम महाराष्ट्रातील या सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे . दोन्हीकडून प्रत्येक मतदारसंघात ताकतीचा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे अजूनही महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी करून इच्छुक उमेदवारांची मोठी यादी दिसत आहे. त्यातून उमेदवार म्हणून कोणाला निश्चित करायचे याचा पेच दोन्हीकडे दिसत आहे. याशिवाय, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा रासप , डॉ. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनीही काही मतदारसंघांमध्ये जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.