कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या प्रश्नांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकसभेत असणे गरजेचे आहे. यासाठी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतून लढवून जिंकणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी रात्री पारगांव येथे संपर्क दौऱ्यानिमित्त बोलताना केले.

देशामध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी लोकांचा आवाज संसदेत पुन्हा त्याच ताकदीने मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लोकवर्गणीतून लढवित असून सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावरती परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, सामाजिक अस्वस्थता यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे. या प्रश्नावर बोलण्याची हिम्मत सध्याच्या लोकप्रतिनिधींच्यामध्ये नाही. केंद्र व राज्य सरकार शहरी व ग्रामीण असा दुजाभाव करत वेगवेगळी धोरणे राबवित असून यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा फटका बसू लागला आहे.

हेही वाच – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा – सोलापुरात वंचितच्या उमेदवारीमुळे मतविभागणी टाळण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

आज दिवसभरात राजू शेट्टी यांनी हातकंणगले तालुक्यातील निलेवाडी, नवे पारगांव, जुने पारगांव, तळसंदे, चावरे, वाठार, किणी व घुणकी या गावांचा संपर्क दौरा केला. यावेळी वरील गावातील जनतेशी संवाद साधत निवडणुकीत सक्रिय होवून प्रचार करण्याची विनंती केली.