शिबिरास दांडी मारणे व बेशिस्त वर्तनाबद्दल तेरा मल्ल व तीन प्रशिक्षकांची राष्ट्रीय शिबिरातून हकालपट्टी करण्याचा धाडसी निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. हे खेळाडू रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाले होते.
भारतीय कुस्ती महासंघातर्फे सोनपत येथे हे शिबिर सुरू आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या मल्लांमध्ये २०१० चा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक विजेता जोिगदरसिंग याचा समावेश आहे. शिबिरास वारंवार दांडी मारणे, पदाधिकाऱ्यांबरोबर अरेरावी करणे, महासंघाने शिबिराबाबत घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणे आदी कारणास्तव तेरा खेळाडूंवर कारवाई झाली आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी नुकतीच शिबिरास आकस्मिक भेट दिली. त्या वेळी त्यांना अनेक खेळाडू शिबिराचे ठिकाणी नसल्याचे आढळून आले. देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत जॉर्जियाचे खेळाडू येथील शिबिरास सरावासाठी आले आहेत. ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान जागतिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हे शिबिर होत आहे. जॉर्जियाच्या खेळाडूंबरोबर सराव करण्याबाबत महासंघाने आदेश दिला होता मात्र हा आदेश गुंडाळून ठेवीत काही मल्लांनी सरावास दांडी मारली असल्याचे शरणसिंग यांना आढळून आले.
विनोदकुमारांची हकालपट्टी
पुरुषांच्या फ्रीस्टाईल संघाचे मुख्य प्रशिक्षक विनोदकुमार, साहाय्यक प्रशिक्षक रजनीश, महिला प्रशिक्षक रामानी चानू यांच्यावरही हकालपट्टीचा हातोडा पडला आहे.
खेळाडूंबरोबरच काही प्रशिक्षकही शिबिरास उपस्थित नसतात अशी तक्रार कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी शरणसिंग यांनी आकस्मिक भेट देत शिबिराच्या ठिकाणी बराच वेळ अन्य खेळाडूंबरोबर सविस्तर चर्चा केली व त्यांच्या तक्रारींचे निरसन केले. अनुपस्थित खेळाडूंबाबत गांभीर्याने पाहिले जाणार असल्याचे शरणसिंग यांनी सांगितले. अनुपस्थित खेळाडूंमध्ये ग्रीकोरोमन विभागाच्या अकरा खेळाडूंचा समावेश आहे. तसेच लखनौची इंदू चौधरी हिच्यावरही हकालपट्टीची कारवाई झाली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या खेळाडू व
प्रशिक्षकांकडून लेखी निवेदन घेतले जाणार आहे.