२०१८ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी खऱ्या अर्थाने कसोटीचं वर्ष ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आयसीसीच्या नियोजीत वेळापत्रकात काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० सामन्याची भर पडणार आहे. यानंतर sportslive.com या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार नवीन वर्षात भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात हा कसोटी सामना रंगणार असून, जुन महिन्यामध्ये हा कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो.

२०१७ सालात आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिला. यानंतर आपल्या देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानावरचे सामने ग्रेटर नोएडा परिसरातील शहिद विजय सिंह प्रतिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर खेळत होता. सुरुवातीला कोलकात्याचं इडन गार्डन मैदान या शर्यतीत पुढे होतं, मात्र अखेर चिन्नास्वामी मैदानावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे भारतीय संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची मागणी केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने ही मागणी मान्य केल्याचं समजतंय. आयपीएलचे सामने संपल्यानंतर भारत आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी अफगाणिस्तानविरुद्धचा एक कसोटी सामना नियोजीत केला जाण्याची शक्यता आहे.