जागतिक क्रिकेट सामन्यात झटपट प्रगती करणाऱ्या अफगाणिस्तानने अनुभवी झिम्बाब्वेचा ५९  धावांनी पराभव करत प्रथमच विश्वचषकाच्या साखळी फेरीत प्रवेश केला. ‘ब’ गटातील पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात अफगाणिस्तानने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. साखळी फेरीत बलाढय़ श्रीलंकेशी  त्यांचा पहिला सामना होणार आहे.

शहजादची सुंदर फटकेबाजी, समिउल्ला शेनवारी व मोहम्मद नाबीच्या ९८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेसमोर १८६ धावांचे आव्हान उभे केले होते, मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा  डाव १२७ धावांमध्ये संपुष्टात आला. अर्धशतक झळकावणाऱ्या नबीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजादने दुसऱ्याच षटकापासूनच फटकेबाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. शहजादने तिसऱ्या षटकात सलग तीन चौकार मारत सामन्यात रंगत आणली. मात्र मोहम्मद शहजादची खेळ फार वेळ टिकली नाही. चौथ्या षटकात शहजादला सीन विलियम्सने बाद केले.  हॅमिल्टन मसाकादझाने शहजादचा सहज झेल घेत त्याची पारी संपुष्टात आणली. शहजादने २३ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४० धावांची खेळी केली.

शहजाद बाद झाल्यावर १४ धावांमध्ये अफगाणिस्तानने तीन फलंदाज गमावले आणि त्यांची बिनबाद ४९ वरून ४ बाद ६३ अशी स्थिती झाली. यावेळी झिम्बाब्वे अफगाणिस्तानला झटपट गुंडाळण्याची स्वप्न पाहत होता. पण शेनवारी आणि नबी यांनी पाचव्या विकेटसाठी ६४ चेंडूत ९८ धावांची भागीदारी केली व संघाला सुस्थितीत आणले. डोनाल्ड तिरीपानोच्या चेंडूवर वुसिमुझी सिबांडाने झेल घेत शेनवारीला तंबूत रवाना केले. शेनवारीने चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावा केल्या. नबीने यावेळी नेत्रदीपक फटक्यांच्या जोरावर अजून एका अर्धशतकाची मेजवानी चाहत्यांना दिली.  नबीने ३२ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरवात निराशाजनक झाली. तिसऱ्या षटकात हामिद हसनने हॅमिल्टन मसाकात्झाचा (११) त्रिफळा उडवत झिम्बाब्वेला पहिला झटका दिला. त्यानंतर सहाव्या षटकात राशिद खानच्या चेंडूवर हामिद हसनने झेल घेत वुसिमुझी सिबांदाला १३ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर ठरावीक फरकाने झिम्बाब्वेचे फलंदाज बाद झाले आणि त्यांच्या हातून सामना निसटला.