News Flash

‘बॅटिंग कशी करावी हे पृथ्वी शॉनं दाखवलं’, KKR च्या कामगिरीवर ब्रेंडन मॅकल्लम नाराज; संघात बदलाचे संकेत

"तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार नाही मारु शकत. पण जर तुम्ही शॉट खेळणारच नसाल तर धावा करणं कठीण आहे"

(PC : BCCI/IPLT20)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरूवारी मुंबईकर पृथ्वी शॉने ४१ चेंडूत ८२ धावांची आणखी एक वादळी खेळी साकारली. फिरकीपटूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीला पृथ्वीच्या फटकेबाजीची उत्तम साथ लाभल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा सात गडी आणि २१ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला. सोबतच कोलकाताने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीने १६.३ षटकात गाठून हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. केकेआरच्या दारूण पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक
ब्रेंडन मॅकल्लम यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर नाराजी जाहीर केली आहे. विशेषतः त्यांनी संघातील फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केलेत. तसेच पृथ्वीच्या फलंदाजीचं कौतुक करताना बॅटिंग कशी करावी हे पृथ्वी शॉनं दाखवलं असंही मॅकल्लम यांनी म्हटलं. शिवाय पुढील सामन्यांमध्ये संघात बदल करण्याचे संकेतही दिले.

“हे अत्यंत निराशाजनक आहे, संघनिवडीवेळी एक खेळाडू म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आणि विश्वास दिला जातो. मैदानात जाऊन न घाबरता आक्रमक क्रिकेट खेळा आणि आपल्या संघाला विजयपथावर आणा अशी सूट खेळाडूंना दिली जाते. मी आणि कर्णधार मॉर्गन यानेही आमच्या खेळाडूंकडून अशाप्रकारच्या खेळाचीच मागणी केली होती, पण दुर्दैवाने आम्ही तसं करु शकलो नाहीत. पृथ्वी शॉने ज्याप्रकारे धडाकेबाज खेळी केली त्याचप्रकारे क्रिकेट आम्हालाही खेळायचं आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार नाही मारु शकत. पण किमान प्रयत्न तर करु शकतो ना…विशेषतः जेव्हा तुम्हाला सर्वप्रकारची सूट आणि स्वातंत्र्य दिलेलं असतं तेव्हा तरी….पण जर तुम्ही शॉट खेळणारच नसाल तर धावा करणं कठीण आहे…येत्या सामन्यांमध्ये संघात नक्कीच काही बदल करण्याची गरज आहे”, अशा शब्दात मॅकल्लमने संघाच्या कामगिरीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, गुरूवारी रंगलेल्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शुबमन गिलची चांगली सलामी आणि डावाच्या उत्तरार्धात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीमुळे कोलकाताला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरात दिल्लीने १६.३ षटकातच विजय साकारला. दिल्लीकडून पृथ्वीने ४१ चेंडूत तब्बल ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात कोलकाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीला ६ चौकार ठोकले. पृथ्वीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 11:32 am

Web Title: after loss against dc kkr head coach mccullum to bring in changes in playing xi sas 89
टॅग : IPL 2021
Next Stories
1 बेंगळूरुचा विजयरथ रोखणे पंजाबसाठी आव्हानात्मक
2 VIDEO : ६ चौकार खाल्ल्यानंतर KKRच्या शिवम मावीने धरली पृथ्वीची मान!
3 DC vs KKR : पृथ्वी शॉच्या वादळापुढे कोलकाता बेचिराख!
Just Now!
X