भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३२९ धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माचे दीडशतक आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत यांची अर्धशतके यांच्या जोरावर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. रोहितने १६१ धावा करत धावांचा दुष्काळ संपवला. आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली. त्यातही अजिंक्यने रहाणेने स्लिपमध्ये घेतलेला झेल साऱ्यांनाच अवाक करणारा ठरला.

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली अतिशय संयमी खेळी करत होता. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीचा अंदाज घेत तो शांततेने एक एक धाव जमवत होता. पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्याला चेंडू समजलाच नाही. चेंडू टप्पा पडून अचानक उडला. चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि ऋषभ पंतकडे गेला. पण त्याला काही समजण्याआधीच चेंडू त्याच्या मांडीला लागून उडाला. चेंडू रहाणेपासून दूर होता पण अजिंक्य रहाणेने अप्रितम झेप घेत चेंडू पकडला आणि मोईन अलीला तंबूत धाडले.

पाहा व्हिडीओ-

तत्पूर्वी, ३३० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली. सलामीवीर रॉरी बर्न्स शून्यावर बाद झाला. पाठोपाठ डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) दोघांना अश्विनने बाद केले. आपली पहिली कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलने तुफान फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या, पण त्यांनादेखील फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही.