पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने अध्र्या गुणाच्या फरकाने आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत अग्रस्थान कायम राखले असले तरी त्याला आता महत्त्वपूर्ण लढाईला सामोरे जावे लागणार आहे. दुसऱ्या विश्रांतीच्या दिवसानंतर शुक्रवारी आनंदचा सामना रशियाच्या पीटर स्विडलर याच्याशी होणार आहे.
चांगल्या सुरुवातीनंतर सावध पवित्रा पत्करणाऱ्या आनंदने सहा सामन्यांत चार गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन आनंदपेक्षा अध्र्या गुणाने मागे आहे. रशियाचे व्लादिमिर क्रॅमनिक आणि पीटर स्विडलर तसेच बल्गेरियाचा व्हेसेलिन टोपालोव्ह आणि अझरबैजानचा शाख्रीयार मामेद्यारोव्ह हे तीन गुणांनिशी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.
जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला या वर्षांअखेरीस होणाऱ्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत आव्हान देण्यासाठी रशियाच्या दिमित्री आंद्रेयकीनला दावेदार समजले जात आहे. मात्र आठ खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन प्रकाराच्या या स्पर्धेत अद्याप जेतेपदासाठी कोण दावेदार असेल, हे निश्चित झालेले नाही. आनंदने पहिल्या दिवसापासूनच अग्रस्थान कायम राखत अजून आपण संपलो नसल्याचे जगाला दाखवून दिले आहे. आनंदसाठी पुढील दोन लढती महत्त्वपूर्ण असणार आहेत. स्विडलरविरुद्ध काळ्या मोहऱ्यांसह आणि आठव्या फेरीत अरोनियनविरुद्ध काळ्या मोहऱ्यांसह आनंदला खेळावे लागणार आहे. या दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळवल्यास, आनंद जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरणार आहे.